पुणे

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत मध्ये एकाच वेळी दोन उपसरपंच; सर्वत्र खळबळ…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : सध्या महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशातील राजकारण फार विचित्र झाले आहे. त्यामुळे राजकारणामध्ये रोज काही ना काही विचित्र प्रकार घडत आहेत. असाच एक आजपर्यंत कधीही न घडलेला प्रकार समोर आला आहे. राज्यात काही दिवसांपूर्वी दोन उपमुख्यमंत्री झाल्याचे सर्वांनी पाहिले आहे. तसाच काहीसा प्रकार शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायतीत घडला आहे. तेथेही चक्क दोन उपसरपंच निवडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारण स्वाती बाळासाहेब लांडे व मनोज उर्फ विशाल विलास आल्हाट या दोघांची एकाच दिवशी उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्याबाबत सोशल मिडीयावर या निवडीच्या प्रकरणाचा धुमाकूळ उडाला असून सर्वत्र खळबळ झाली आहे.

सध्या राज्यात दोन उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दोन उपसरपंच निवडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यापूर्वी शासनाकडे करण्यात आलेली होती. पण अजूनपर्यंत अशा दोन उपसरपंच निवडीला शासनाकडून परवानगी मिळाली नाही. परंतु नुकतेच तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतचे उपसरपंच राहुल भुजबळ यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झालेले असताना सरपंच अंकिता भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांचे नियंत्रणाखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच अंकिता भुजबळ, मावळते उपसरपंच राहुल भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भुजबळ, सचिन ढमढेरे, संतोष ढमढेरे, नवनाथ ढमढेरे, सुरेश भुजबळ, रोहिणी तोडकर, अनिल भुजबळ, स्वाती लांडे, कोमल शिंदे, विशाल आल्हाट, कीर्ती गायकवाड, जबीन बागवान हे उपस्थित होते.

दरम्यान उपसरपंच पदासाठी स्वाती लांडे व मनोज उर्फ विशाल आल्हाट यांनी अर्ज दाखल केले मात्र विशाल आल्हाट यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्याने उपसरपंच पदी स्वाती बाळासाहेब लांडे यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बापूसाहेब गोरे यांनी जाहीर केले. मात्र काही वेळाने सरपंच अंकिता भुजबळ यांनी मनोज उर्फ विशाल आल्हाट यांना उपसरपंच पदी निवड करत असल्याबाबतचे पत्र दिले आणि त्याबाबत सोशल मिडीयावर गावाला दोन उपसरपंच असल्याचे जाहीर झाले. त्यामुळे शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून अनेक ग्रामपंचायतींच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत बोलताना प्रोसेडिंग नुसार आमच्या नियमांमध्ये स्वाती लांडे या एकच उपसरपंच असून सरपंच यांनी विशाल आल्हाट यांना उपसरपंच पदी निवडीचे पत्र दिले त्याबाबत आपणाला काहीही माहिती नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे सांगितले. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी दोघांची निवड करण्यात आलेली माहिती मिळाली असून सदरील प्रकार घटना बाह्य असून त्याबाबतचे कागदपत्र मागवण्यात आलेले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रामेश्वर राठोड यांनी सांगितले.