पुणेमहाराष्ट्र

“कंत्राटी सफाई कामगारांना तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने कुटुंबावर सध्या उपासमारीची वेळ, प्रमोद नाना भानगिरे आक्रमक

हडपसर – येथील क्षेत्रीय कार्यालयात काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना गेली तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. पालिका प्रशासन व ठेकेदारांनी याबाबत गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर वेतन करावे, अशी मागणी या कामगारांनी केली आहे.

या कामगारांनी नुकतीच सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील व शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांची सामुहिक भेट घेऊन आपली व्यथा व्यक्त केली.

हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण २२ आरोग्यकोठी आहेत. या आरोग्य कोठ्यातंर्गत एकूण ७०३ कंत्राटी सफाई कामगार काम करीत आहेत. त्यांच्याकडून दररोज पाहटेपासून परिसराची साफसफाई केली जात आहे. मात्र, गेली तीन महिन्यांत त्यांना हक्काचे वेतन मिळू शकले नाही.

त्यामुळे या कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाट पाहूनही वेतन मिळत नसल्याने त्यांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात एकत्र येऊन शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. शिवसेना जिल्हाध्यक्ष उल्हास तुपे यावेळी उपस्थित होते.

भानगिरे यांनी यावेळी तात्काळ सहाय्यक आयुक्त ढवळे व महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्याशी संपर्क साधून सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.

‘सफाई कामगार प्रामाणिकपणे काम करीत असताना व हातावर पोट असताना पालिका प्रशासनाने त्यांचे वेतन वेळच्या वेळी देण्यात प्राधान्य दिले पाहिजे. ठेकेदाराकडे या कर्मचाऱ्यांचा पगार करण्याची जबाबदारी आहे. त्याने या बाबीकडे दुर्लक्ष न करता तातडीने त्यांचे वेतन करावे. येत्या दोनतीन दिवसात त्यांना वेतन न मिळाल्यास या कामगारांच्या न्यायासाठी शिवसेना आंदोलन करील.’

– प्रमोद भानगिरे, शिवसेना शहर प्रमूख

‘७०३ कामगारांपैकी १०३ कामगारांचे मागील तर सर्वांचे चालू वेतन राहिले आहे. त्याबाबतचा अहवाल मुख्य कार्यालयाकडे पाठविला आहे. येत्या दोन दिवसांत या सफाई कामगारांना वेतन मिळेल.’

– बाळासाहेब ढवळे पाटील, सहाय्यक आयुक्त, हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय