पुणे

बुधवार पेठेत वस्तऱ्याने गळा चिरून खून करणारा जेरबंद फरासखाना पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरात आरोपीला पकडले

पुणे, दि. १० : बुधवार पेठेतील क्रांती चौकात वस्तऱ्याने गळा चिरून खून करणाऱ्याला पुणे रेल्वे स्थानक पोलिसांनी अटक केली. नईम शेख असे खून झालेल्याचे नाव आहे, तर कलाम उर्फ रूबेल शेख असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पश्चिम बंगालमधील महिला राहायला आहे. आरोपी कलाम शेख तिचा पती आहे. सहा महिन्यांपूर्वी तिने नईम शेख याच्याशी विवाह केला होता. दोघेजण एकत्र राहत होते. पत्नीने दुसरा विवाह केल्याने कलाम चिडला होता. तो नईमच्या पाळतीवर होता. बुधवार पेठेतील क्रांती चौकात सागर बिल्डींगजवळ शुक्रवारी सायंकाळी कलाम थांबला होता. काही वेळानंतर नईम तेथे आला. त्याने खिशातून वस्तरा काढला. नईमच्या गळ्यावर वस्तऱ्याने वार केला. गंभीर जखमी झालेल्या नईमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कलाम घटनास्थळावरून पसार झाला. तो साथीदारासोबत पश्चिम बंगालला पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली. पुणे रेल्वे स्थानक परिसरातून त्याला साथीदारासह रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.