मुंबई : पुलवामा हल्ल्याला पाकिस्तान जवाबदार असून, पुलवामामध्ये दोनशे किलो आरडीएक्स आलेच कसे, हे आमच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे. याचे उत्तर देशातील जनतेला हवे आहे. पंतप्रधान मोदी, तुमच्याकडे वेळ असेल तर उत्तर द्या, असा हल्लाबोल एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी चढवला.
वंचित बहुजन आघाडीने सत्ता संपादन मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईच्या शिवाजी पार्कवर आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. मौलाना मसूद अजहर मौलाना नसून सैतान आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान, लष्कराच्या धमक्यांना आम्ही किंमत देत नाही, असे ओवेसी म्हणाले. काश्मिरमध्ये मोदी तुम्ही महेबुबा मुफ्ती सोबत सत्तेत होता ना ? तुम्ही तेथे काय काम केले याचे उत्तर देण्याची मागणीही केली.
इकडच्या भटक्या विमुक्तांना ते १९५२ साली मिळाले. परंतु गाव मिळाले नाही. अशा भटक्या समाजाला गाव, घर देणे, त्यांना स्थित करण्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याच सरकारने स्वीकारली नाही. स्थैर्य आल्याशिवाय ते विकसित होणार नाहीत. त्यांना स्थिर करण्याची जबाबदारी वंचित बहुजन विकास आघाडीची आहे, असा आशावाद प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.
वंचित बहुजन मेळाव्याच्या विराट शक्तिप्रदर्शन केले. एरव्ही ठाकरेंच्या सभांना तुडुंब भरणारे हे मैदान आज खचाखच भरून वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद दाखवून दिली. यामुळे प्रस्थापित पक्षांची समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे.
आज दुपारपासून मेळाव्यासाठी गर्दी जमण्यास सुरुवात झाली. शिवाजी पार्ककडे जाणारे रस्ते वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. विविध समाजातील कार्यकर्ते आपली पारंपरिक वेशभूषा करून दाखल झाले होते. सभेच्या सुरुवातीला विविध लोकगीते सादर करण्यात आली. बी. जी. कोळसे पाटील, शंकर लिंगे, गोविंद दळवी, अमित भुईगळ, लक्ष्मण माने, वारीस पठाण, तृतीय पंथी बिशा शेख तसेच अन्य मान्यवरांची भाषणे झाली.
२ मार्च रोजी बारामतीत सभा
बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला. तेथे २ मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीची सभा होणार आहे. बी. जी. कोळसे पाटील यांनी आपल्या भाषणात ही घोषणा केली. संघमुक्त भारताची हाक मी सर्वात आधी शनिवारवाड्यातून दिली, असे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोन गुंड असल्याची टीकाही त्यांनी केली.
