कै. सादबा बाळाजी कोद्रे उड्डाणपुलाचे राष्ट्रवादीकडून उदघाटन
मुंढवा ताडीगुत्ता चौकातील उड्डाण पूल वाहतुकीस खुला
हडपसर/पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज)
मगरपट्टा- मुंढवा या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ताडीगुत्ता चौक मुंढवा ते मगरपट्टा सिटीच्या मागील बाजूला असलेल्या रस्त्यावर ये-जा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या उद्घाटनाचा श्रेयवाद आज चांगलाच रंगला . दुपारी भाजप-शिवसेना -आरपीआय युतीच्या तर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने असे एका दिवसात दोन वेळा कै. सादबा बाळाजी कोद्रे या नवीन उड्डाण पुलाचे उद्घाटन करून हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला.
मुंढवा ताडीगुत्ता चौकात उभारण्यात आलेल्या या उड्डाण पुलाचे उद्घाटन आज दुपारी भाजपा – शिवसेना व आरपीआयच्या पदाधिकारी यांच्या सोबत भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांनी,तर संध्याकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उड्डाण पुलाचे उद्घाटन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. हा पूल पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवाद सुरू झाला. सन २०१६ मध्ये या उड्डाण पुलाचे काम हाती घेण्यात आले होते. उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्यावर ताबा घेणे आणि त्याच्या मोबदला मिळण्यावरून काही शेतकऱ्यांनी रस्ता अडवला होता. त्यामुळे उड्डाण पुलाचे उद्घाटन लांबणीवर पडले होते. दरम्यान शेतकऱ्यांच्या संमतीने नुकताच हा रस्ता पूर्ण करण्यात आल्यानंतर उड्डाणपुलाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान आज दुपारी आमदार योगेश टिळेकर यांनी उड्डाण पुलाचे उद्घाटन उरकून घेतले.
तर सायंकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उड्डाण पुलाचे उद्घाटन करून हा पूल वाहतुकीस खुला केला यावेळी शहर अध्यक्ष व नगरसेवक चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका पूजा कोद्रे, हेमलता मगर, बंडूतात्या गायकवाड, निलेश मगर, माजी आमदार बापू पठारे, राजलक्ष्मी भोसले माजी महापौर प्रशांत जगताप, वैशाली बनकर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उड्डाण पुलाच्या कामासाठी तसेच रस्त्यासाठी निधीची उपलब्धता आणि रखडलेल्या रस्त्याच्या जागेचे संपादन आम्हीच केल्याचे दावे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी यावेळी केले.
मगरपट्टा प्रभागाचा मी नगरसेवक असताना सन २०११च्या अर्थ संकल्पात यास मंजुरी मिळाली. पुढे नगरसेविका चंचला कोद्रे यांनी निधी टाकून सन २०१६ मध्ये प्रत्यक्ष उड्डाण पुलाचे काम सुरू केले. नगरसेवक बंडू गायकवाड व नगरसेविका हेमलता मगर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही नगरसेवकांनी या उड्डाण पुलाच्या उभारणीचे काम केले. उद्घाटनासाठी महापौर यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. आज उद्घाटन होणार जाहीर झाल्यानंतर आम्ही केलेल्या विकास कामाचे श्रेय भाजप सत्ताधारी घेत आहेत. दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची भाजपची सवय आहे. मात्र आम्ही लोकांच्या सोयीसाठी तो आज खुला केला आहे. असे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष व नगरसेवक चेतन तुपे यांनी सांगितले.
