
सावली फाउंडेशन च्या वतीने पारितोषिक वितरण संपन्न
हडपसर (रोखठोक महाराष्ट्र न्युज)
सन१९६५ साली झालेल्या भारत-पाक युद्धाच्या वेळी लालबहादूर शास्त्री यांनी दिलेली ‘जय जवान, जय किसान’ ही अजरामर घोषणा आजही देशवासीयांना प्रेरणा देते.‘कोणतेही आक्रमण देशवासी माफ करणार नाहीत. त्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ.’ देशाच्या हितासाठी आम्ही सर्व भारतीय एक आहोत, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सावली फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले बनवा व चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून अजित पवार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, माजी आमदार विलास लांडे, बापूसाहेब पठारे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, सरचिटणीस राजलक्ष्मी भोसले, नगरसेवक योगेश ससाणे, प्रशांत जगताप,बंडूतात्या गायकवाड, नगरसेविका वैशाली बनकर, हेमलता मगर, रत्नप्रभा जगताप, माजी नगरसेवक दत्तोबा ससाणे, सुनील बनकर, निलेश मगर ,जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी – माजी नगरसेवक पदाधिकारी व सावली फाउंडेशनचे सदस्य आणि पालक व विद्यार्थी तसेच विजेते स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावली फाउंडेशनचे नगरसेवक योगेश ससाणे व पदमा ससाणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्पर्धा म्हटलं की हार जीत आलीच असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले की थोर पुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. आई वडील आणि गुरुजनांचा आदर करावा. इंटरनेट आणि मोबाईल वरील खेळामुळे बालपण हरवत चालल आहे. हे भविष्यात घातक आहे असेही पवारांनी यावेळी सांगितले. हडपसर मतदार संघातील ९४ शाळांमधील ८० हजार विद्यार्थ्यानी स्पर्धेत सहभाग घेतला होता. सर्व विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रशिस्ती पत्र देण्यात आले तसेच परिसरातील शाळांमध्ये जाऊन विध्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या पॅडचे मोफत वाटप करण्यात आल्याची माहिती यावेळी सावलीचे अध्यक्ष व नगरसेवक योगेश ससाणे यांनी दिली.
