मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुणाचाही उपमर्द केलेला नाही. त्यांनी १९९१ शाळांतली आठवण सांगितली, कुणालाही दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मनात विखे कुटुंबियांबद्दल द्वेष भरला आहे. माझे वडील बाळासाहेब विखे पाटील आज हयात नाहीत. निवडणुकीचा संदर्भ घेऊन हयात नसलेल्या व्यक्तीवर शरद पवारांनी बोलायला नको होते, पवारांची टिका मला बोचली, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले होते. नगरमध्ये कुणाच्याच प्रचाराला जाणार नाही, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. त्याला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
१९९१ साली बाळासाहेब विखे पाटील यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. महाराष्ट्रातून सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्याचे आदेश राजीव गांधी यांनी दिले होते. त्यावेळेस काँग्रेसची विचारधारा मानणाऱ्या नगरमधील सर्व नेत्यांना शरद पवार यांनी एकत्र आणले आणि यशवंतराव गडाख हे नगरमधून निवडून आले होते. ही आठवण फक्त शरद पवार यांनी सांगितली. त्यात कुणाला दुखावण्याचा हेतू नव्हता, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
कुणाला खासदार व्हायची महत्वाकांक्षाच असेल तर त्याला आम्ही काहीही करू शकत नाही, असे त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.
