पुणे

दिवे घाटात भाईगिरीचा उच्छाद; रोहित पवारांनी केली कठोर कारवाईची मागणी

दिवे घाट परिसरातून समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी शेकडो दुचाकींवरून आलेल्या युवकांच्या टोळक्याने हातात कोयते आणि तलवारी घेऊन रॅली काढत दहशत माजवल्याचा आरोप होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही युवक रस्त्यावर कोयते हवेत फिरवत, आरडाओरडा करत आणि स्टंटबाजी करताना दिसत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणावर रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत पोलिसांनी या टोळक्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
रोहित पवार म्हणाले की, अशा टोळक्यांना वेळेत आवर घातला नाही तर भविष्यात मोठ्या गुन्हेगारी घटनांना खतपाणी मिळू शकतं.
दरम्यान, नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे. हातात तलवारी, कोयते घेऊन रस्त्यावर दहशत माजवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई का होत नाही? अशा टोळक्यांना राजकीय पाठबळ आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पुण्यात वाढती भाईगिरी, नशा आणि गुन्हेगारी प्रवृत्ती यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.