देशभर गाजत असलेल्या NEET 2026 पेपरफुटी प्रकरणात आता महाराष्ट्र कनेक्शन अधिक गडद होताना दिसत आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात CBI च्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या ११ आरोपींपैकी तब्बल ७ जण महाराष्ट्रातील असल्याने “पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्रात होते का?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणाची सुरुवात राजस्थानमधील सिकर शहरातून झाली. पण तपास जसजसा पुढे गेला, तसतसे धागेदोरे पुणे, लातूर आणि महाराष्ट्रातील इतर भागांपर्यंत पोहोचले. पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना अटक झाल्यानंतर या रॅकेटचा मोठा पर्दाफाश झाला.
CBI च्या माहितीनुसार, मांढरे यांनी केवळ जीवशास्त्र विषयाचे प्रश्न तयार केले नव्हते, तर वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांच्या प्रश्नांचे अनुवादनही केले होते. त्यामुळे त्यांच्याकडे संपूर्ण प्रश्नपत्रिकेचा मोठा भाग उपलब्ध होता. तपासात असेही समोर आले की, एप्रिल २०२६ मध्ये पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निवडक विद्यार्थ्यांसाठी खास शिकवणी वर्ग घेतले गेले.
या कटात मनीषा वाघमारे आणि लातूरचे निवृत्त रसायनशास्त्र प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांचाही सहभाग असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, प्रश्नपत्रिकेचे मराठी अनुवादन करणाऱ्यांनाच संपूर्ण प्रश्नसंच उपलब्ध होत असल्याने त्याच माध्यमातून पेपरफुटी झाल्याचा संशय अधिक बळावला आहे.
NEET परीक्षेसाठी इंग्रजीसह १२ प्रादेशिक भाषांमध्ये प्रश्नपत्रिका तयार केली जाते. NTA कडून प्रत्येक भाषेसाठी दोन अनुवादक नेमले जातात. कमी लोकांच्या हातातून प्रश्नपत्रिका जावी म्हणून ही प्रक्रिया गोपनीय ठेवली जाते. मात्र याच यंत्रणेतील लोकांनी गैरफायदा घेतल्याचा आरोप आता समोर येत आहे.
तपास यंत्रणांकडून पुण्यातील विविध ठिकाणी चौकशी सुरू असून विद्यार्थी, मध्यस्थ आणि आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचाही तपास केला जात आहे. या प्रकरणामुळे देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
NEET 2026 पेपरफुटीचा महाराष्ट्र कनेक्शन? CBI तपासात धक्कादायक खुलासे
