तुरुंगातूनच चालवत होता टोळी! बंडू आंदेकरवर पुणे पोलिसांचा मोठा प्रहार

Rokhthok Maharashtra 29 0

पुण्यातील गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडवणारा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.
कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याला आता तुरुंगातच पूर्णपणे ‘क्वारंटाईन’ करण्याची तयारी सुरू झाली आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारागृह प्रशासनाला याबाबत पत्र पाठवत कठोर नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयानंतर बंडू आंदेकरला आता तुरुंगात कुणालाही भेटता येणार नाही. नातेवाईक, साथीदार किंवा टोळीतील सदस्य… सर्व भेटींवर बंदी घालण्यात येणार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बंडू आंदेकर हा तुरुंगात असतानाही टोळीचं नेटवर्क चालवत होता.
कारागृहातील भेटीगाठींचा वापर करून तो बाहेरील साथीदारांना सूचना देत होता.
इतकंच नाही, तर पुण्यात झालेल्या तीन हत्यांमध्येही त्याचं नाव आणि चिथावणीखोर भूमिका समोर आल्याची माहिती पोलिसांकडे आहे.
यामुळे पुणे पोलिसांनी आता थेट त्याचा संपर्कच तोडण्याचा निर्णय घेतला आहे.
कारागृहात त्याला इतर कैद्यांपासून वेगळं ठेवलं जाणार असून बाहेरील जगाशी असलेला प्रत्येक संपर्क बंद केला जाणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक मोठा निर्णयही घेण्यात आला आहे.
यापुढे बंडू आंदेकरला कोर्टात प्रत्यक्ष हजर केलं जाणार नाही.
तो केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच न्यायालयीन सुनावणीत सहभागी होणार आहे.
कारण न्यायालय परिसरातही टोळीशी संपर्क होण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही.
या कारवाईमुळे आंदेकर टोळीचं नेटवर्क कमकुवत होईल आणि शहरातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गुन्हेगार कितीही मोठा असला… तुरुंगाच्या भिंतीआडून गुन्हेगारी चालवू देणार नाही… असा स्पष्ट आणि कडक संदेश पुणे पोलिसांनी दिला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.