पुण्यातील हडपसर परिसरातील आनंद नगर आणि पारिजात सोसायटी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, कालव्यालगत मोठ्या प्रमाणात वापरलेल्या इंजेक्शनचा खच आढळून आला आहे.
स्थानिकांचा आरोप आहे की, संध्याकाळनंतर काही युवक या परिसरात जमा होतात. काहीजण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, परिसरात दहशतीचे वातावरण असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
तसेच, हडपसर गाडीतळ परिसरातील एका मेडिकलमधून रात्री उशिरापर्यंत संशयास्पद हालचाली होत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
गेल्या काही महिन्यांत वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि इतर गुन्हेगारी प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
या प्रकरणात हडपसर पोलीस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इप्पर कोणती भूमिका घेतात, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
कालव्याजवळ इंजेक्शनचा खच, अमली पदार्थांचा संशय? नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
