दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश! २० हजार लिटर संशयास्पद दूध नष्ट

Rokhthok Maharashtra 29 0

महाराष्ट्रात दूध भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत १ कोटी ४७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २० हजार लिटरहून अधिक संशयास्पद दूध नष्ट करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी तपासात काही केंद्रांचे धागेदोरे गोवर्धन आणि सोनाई डेअरीच्या ब्रँडेड पॅकेजिंगशी संबंधित असल्याचे सांगितले असून तपास सुरू आहे.
पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे एकाच वेळी छापेमारी करत अन्न व औषध प्रशासनाने कथित दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संशयित केंद्रांमध्ये दुधाचा फेस आणि घट्टपणा वाढवण्यासाठी शाम्पूसह इतर रसायने, दूषित पाणी आणि निकृष्ट दर्जाची दूध पावडर वापरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान बनावट दुधाच्या पॅकेजिंगवर काही ठिकाणी ‘सोनाई डेअरी’ ब्रँडचे लेबल आढळल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले असून दोन्ही कंपन्यांशी संबंधित बाबींची चौकशी सुरू आहे. या आरोपांवर संबंधित कंपन्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
एफडीएने नागरिकांना केवळ अधिकृत आणि विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच दूध खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.