खाकी वर्दी घालून यात्रेत फिरणारी तोतया महिला पोलीस पकडली!

Rokhthok Maharashtra 9 0

खाकी वर्दी घालून यात्रेत फिरत होती तोतया महिला पोलीस छत्रपती संभाजीनगरमधील ऐतिहासिक कर्णपुरा यात्रेत तोतया महिला पोलिसाचा प्रकार समोर आला आहे. महिला पोलिसांचा गणवेश परिधान करून यात्रेत फिरणाऱ्या २१ वर्षीय तरुणीला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले.
आम्रपाली रमेश नरवाडे असं या तरुणीचं नाव असून, आपण नाशिक ग्रामीण पोलीस दलात भरती झालो असून यात्रेच्या बंदोबस्तासाठी आल्याचा दावा तिने केल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांनी अधिकृत ओळखपत्र आणि कागदपत्रे मागितल्यानंतर ती दाखवता न आल्याने तिचा बनाव उघड झाला.
धक्कादायक बाब म्हणजे, आम्रपालीने पोलीस प्रशिक्षण पूर्ण केल्याचं आणि पोलीस दलात भरती झाल्याचं कुटुंबीयांना सांगितल्याचा आरोप आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रशिक्षण सुरू असल्याचंही तिने सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी महिला पोलीस अंमलदार मीना नागनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार गवळी करत आहेत.
खाकी वर्दीचा गैरवापर करून पोलीस असल्याचा आव आणण्यामागे नेमका उद्देश काय होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.