पुण्यात तीन वर्षांच्या चिमुकल्याला टॉयलेटमध्ये डांबल्याचा आरोप!
पुण्यातील घोरपडी परिसरातील युरो किड्स शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत मस्ती केल्याच्या कारणावरून अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्याला स्वच्छतागृहात डांबून ठेवल्याचा आरोप संबंधित शिक्षिकेवर करण्यात आला आहे. याप्रकरणी शाळेच्या शिक्षिकेसह व्यवस्थापिकेविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर रोजी बी. टी. कवडे रस्त्यावरील शाळेत हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. मुलाला घरी घेण्यासाठी आलेल्या आईला सुरुवातीला तो खोलीत बंद असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मुलाने स्वच्छतागृहात डांबून ठेवल्याचे सांगितल्यानंतर आईने सीसीटीव्ही चित्रीकरणाची मागणी केली.
पालकांच्या आरोपानुसार, २१ सप्टेंबर रोजी दाखवण्यात आलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणात शिक्षिका मुलाला स्वच्छतागृहात बंद करताना दिसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच चित्रीकरण ओव्हरराइट झाल्याचा दावाही शाळा व्यवस्थापनाने केल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी मुंढवा पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे शाळांमधील चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





