आषाढी वारीदरम्यान जेजुरीजवळ अत्यंत दुर्दैवी अपघात घडला असून, या भीषण दुर्घटनेत *तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू* झाला आहे. तर *15 ते 16 वारकरी जखमी* झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना जेजुरीजवळील भोंगळे मळा परिसरात घडली. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसोबत वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने जात असताना, वारकऱ्यांचे सामान घेऊन जाणारा ट्रक अचानक अनियंत्रित होऊन दिंडीत घुसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मृत वारकरी महिलांची नावे *राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे आणि नंदा पवार* अशी आहेत. या तिघीही सांगली जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे.
अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.
या दुर्घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून, जखमी वारकऱ्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आषाढी वारीदरम्यान घडलेल्या या घटनेमुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात असून, वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जेजुरीजवळ भीषण अपघात; 3 महिला वारकरी ठार, 15 हून अधिक जखमी
