मालकांच्या आठवणीत श्वानाचे डोळे पाणावले! कुणालची वाट पाहत दिवसभर अन्नालाही हात लावला नाही
छत्रपती संभाजीनगरच्या चांदगुडे कुटुंबाच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळला आहे. मात्र, या घटनेनंतर एक मुक्या जीवाची अवस्था पाहून प्रत्येकाचं काळीज पिळवटून जात आहे.
ज्या घरात काल माणसांची लगबग होती, तिथे आज एक श्वान एकटाच उंबरठ्यावर बसून आपल्या मालकांची वाट पाहतोय.
कुणाल चांदगुडे या श्वानाला रोज सकाळी फिरायला घेऊन जायचा. कुटुंबीयांनी त्याला जणू घरातील सदस्याप्रमाणेच जपलं होतं. मात्र, अचानक कुणालसह त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आणि हा मुका जीव पूर्णपणे एकटा पडला.
दुपारपासून हा श्वान वारंवार घराच्या दरवाज्याकडे पाहतोय… घरातील प्रत्येक कोपरा हुंगतोय… जणू त्याचे मालक आत्ताच परत येतील, अशी त्याला आशा आहे.
शेजाऱ्यांनी खिडकीतून त्याला अन्न देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने अन्नाचा कणही खाल्ला नाही.
रात्री उशिरापर्यंत तो घराच्या उंबरठ्याकडे डोळे लावून बसला होता.
ज्यांच्यासोबत त्याने रोजचा दिवस घालवला, ज्यांच्या हातून त्याला प्रेम मिळालं… ते आता कधीच परतणार नाहीत, याची जाणीव या मुक्या जीवाला झाली आहे की नाही, हे सांगता येणार नाही.
पण त्याची वाट पाहणारी नजर मात्र एकच प्रश्न विचारतेय—
‘माझे मालक परत कधी येणार?’
ही दृश्यं पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत नकळत अश्रू आणणारी आहेत.





