कराडमध्ये प्रेयसीचा गळा दाबून खून? आरोपी सागर माने पोलिसांच्या ताब्यात!
कराड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरातील झोपडपट्टी भागात एका महिलेचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या हत्या प्रकरणी कराड तालुक्यातील जुने मालखेड येथील सागर माने याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला आणि सागर माने यांच्यात गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित महिला स्टेडियमजवळील झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास होती.
गुरुवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. याचवेळी सागर माने याने महिलेचा गळा दाबल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेनंतर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सागर माने याला ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याच्या या घटनेने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरासह संपूर्ण कराड शहरात खळबळ उडाली आहे.





