मैत्रिणीशी बोलला… MPSC विद्यार्थ्याचं अपहरण!

Rokhthok Maharashtra 12 0

मैत्रिणीसोबत बोलतो म्हणून MPSC विद्यार्थ्याचं भररस्त्यात अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पेरुगेटजवळ झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
प्रसाद सूर्यवंशी, वय 28, हा नारायण पेठेत MPSC परीक्षेचा अभ्यास करत होता. त्यावेळी ब्लॅक फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओमधून आलेल्या सुमारे 10 जणांनी त्याला मारहाण करत जबरदस्तीने कारमध्ये बसवलं आणि पळवून नेलं.
प्रसादला मैत्रिणीसोबत बोलण्यावरून मारहाण करून त्याचं अपहरण केल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं आहे. सिंहगड रोडच्या दिशेने जात असतानाही त्याला पुन्हा मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, अपहरणाची माहिती 112 क्रमांकावर मिळताच पोलिसांनी तातडीने कारचा पाठलाग केला आणि प्रसादची सुटका केली.
या प्रकरणी सागर रमेश बोराडे आणि किशोर बाळासाहेब सावंत या दोघांना रात्री 1 वाजून 23 मिनिटांनी ताब्यात घेण्यात आलं असून, स्कॉर्पिओही पोलिसांनी जप्त केली आहे. इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, प्रसादवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.