हडपसर स्वतंत्र महापालिका का हवी? मेट्रो, विमानतळ, उद्योग अन् वाढत्या लोकसंख्येचा मोठा प्रश्न
पुण्याच्या पूर्व भागाचं भवितव्य बदलणार… पण या विकासाला सक्षम प्रशासनाची जोड मिळणार का?
पुण्याच्या पूर्व भागातलं हडपसर आता केवळ उपनगर राहिलेलं नाही… तर पुण्याच्या पुढच्या विस्ताराचं प्रमुख केंद्र बनत आहे.
मगरपट्टा सिटी, अमनोरा टाऊनशिप, हडपसर आणि रामटेकडी औद्योगिक वसाहती, खराडी, मांजरी, शेवाळेवाडी, फुरसुंगी आणि लोणी काळभोरपर्यंतचा परिसर वेगाने विकसित होत आहे. मोठ्या कंपन्या, रोजगाराच्या संधी, गृहप्रकल्प आणि व्यावसायिक विकासामुळे या भागाची लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण सातत्याने वाढतोय.
आणि आता या विकासाला आणखी मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
पुणे मेट्रोच्या भविष्यातील मार्गांमध्ये हडपसर हे महत्त्वाचं केंद्र बनत आहे. खडकवासला–हडपसर–खराडी लाईन ४ च्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. त्याचबरोबर हडपसर–लोणी काळभोर आणि हडपसर–सासवड या मार्गांसाठीही प्रशासनिक प्रक्रिया पुढे सरकली आहे.
याचा अर्थ काय?
हडपसरपासून पूर्व पुण्याचा विस्तार आता लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि पुढे यवतच्या दिशेने नव्या शहरी पट्ट्याला जन्म देऊ शकतो.
पुरंदर विमानतळ, पालखी मार्गाचा विकास आणि वाढणारे औद्योगिक क्षेत्र यामुळे भविष्यात या संपूर्ण पट्ट्याचं आर्थिक महत्त्व आणखी वाढण्याची शक्यता आहे. स्वतंत्र महापालिकेच्या मागणीचे समर्थकही पुरंदर विमानतळ आणि पालखी मार्गामुळे या भागाच्या भविष्यातील वाढीचा मुद्दा मांडत आहेत.
पण दुसरीकडे प्रश्न आहे तो नागरी सुविधांचा!
मगरपट्टा चौकापासून हडपसर, गाडीतळ, रामटेकडी, फातिमानगरपर्यंतची वाहतूक कोंडी… पर्यायी रस्त्यांचा अभाव… पाणी, ड्रेनेज, कचरा, कालव्यांची स्वच्छता… वाढत जाणारे बांधकाम… आणि त्याच वेगाने वाढणाऱ्या नागरी समस्या.
आज पुणे महापालिकेची भौगोलिक हद्द मोठी झाली आहे. २०२१ मध्ये २३ गावांचा समावेश झाल्यानंतर PMCचं क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात वाढलं आणि पूर्व पुण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था करण्याची मागणी अधिक तीव्र झाली.
हडपसर स्वतंत्र महापालिका करण्याची चर्चा जवळपास दशकभरापासून सुरू आहे. २०२३ मध्ये राज्य सरकारने हडपसर-वाघोली परिसरासाठी स्वतंत्र महापालिका किंवा वाघोलीसाठी स्वतंत्र नगरपरिषद करण्याबाबत पुणे महापालिकेचं मतही मागवलं होतं.
मात्र प्रश्न अजूनही कायम आहे…
इतका मोठा विकासाचा पट्टा तयार होत असताना प्रशासनाचं विकेंद्रीकरण कधी होणार?
हडपसरला स्वतंत्र महापालिका झाली तर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होईल, विकासाचं नियोजन स्थानिक गरजेनुसार करता येईल आणि पूर्व पुण्याच्या नागरी समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल—असं या मागणीच्या समर्थकांचं म्हणणं आहे.
पण स्वतंत्र महापालिका म्हणजे केवळ हद्द बदलणं नाही… त्यासाठी आर्थिक क्षमता, पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि दीर्घकालीन विकास आराखड्याचाही सखोल अभ्यास गरजेचा आहे.
म्हणूनच आता सवाल एकच—
हडपसरला पुण्याचं उपनगर म्हणूनच ठेवणार… की ‘नवं पुणे’ म्हणून स्वतंत्र प्रशासकीय ओळख देणार?
कारण विकासाची गती पाहता…
नवं पुणं उभं राहतंय, पण त्यासाठी नवं प्रशासनही आवश्यक आहे का? हा निर्णय आता सरकारने घ्यायची वेळ आली आहे!





