भरधाव यामाहा दुभाजकावर आदळली; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू
खराडी-हडपसर बाह्यवळण मार्गावर मगरपट्टा परिसरात भरधाव यामाहा दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
मृत तरुणाचे नाव आकाश प्रकाश पुरभे, वय २७, रा. सिद्धनाथ निवास, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर असे आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार रवींद्र टेंगले यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश १७ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास खराडी-हडपसर बाह्यवळण मार्गावरून जात होता. मगरपट्टा परिसरात भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर आदळली.
या अपघातात आकाशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
अपघाताच्या चौकशीनंतर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला असून, भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रवींद्र टेंगले करीत आहेत.





