“पोटात आग होतेय… मी मरेल पण मान खाली घालू देणार नाही!” | रात्री 2 वाजता जरांगे भावुक
“पोटात आग होतेय… मी मरेल पण मान खाली घालू देणार नाही!”
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील रात्री उशिरा बीडच्या पाटोदा येथे दाखल झाले. दीड वाजण्याच्या सुमारासही हजारो समर्थक त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जरांगे पाटील भावुक झाले.
“माझं शरीर थकलं आहे… पण मी खचलो नाही, घाबरलो नाही. माझ्या समाजासाठी मी सरकारला अंगावर घेतलंय,” असं ते म्हणाले.
समर्थकांनी त्यांना सलाईन घेण्याची विनंती केली. त्यावर, “तुमच्या लेकरांसाठी लढताना माझं शरीर थकलं आहे. पण मी मरेल, तुम्हाला मान खाली घालू देणार नाही,” असं जरांगे म्हणाले.
पुढे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, “मी तीन वर्षे फडणवीसांना हरवलं आहे,” असा दावा केला. तसेच आपल्याविरोधात गोळ्या घालण्याचं षड्यंत्र रचल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, जरांगे पाटील १५ सप्टेंबरपासून मुंबईच्या दिशेने निघाले असून, १९ सप्टेंबरला आझाद मैदानावर आंदोलन करण्याची त्यांची घोषणा आहे. मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याचंही वृत्त आहे.
आता जरांगेंच्या या भावुक आवाहनानंतर मुंबईच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.





