पुण्यात बदलत्या हवामानामुळे आजारांत वाढ! नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
पुण्यात दिवसा कडक ऊन, रात्री गारवा आणि अधूनमधून पाऊस, या बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराच्या तापमानात सातत्याने चढ-उतार जाणवत आहेत. त्यामुळे सर्दी, ताप, अंगदुखी, विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजारांच्या तक्रारी वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
यासोबतच शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येतही वाढ झाल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दमदार पावसानंतर अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याने डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नये आणि डासांपासून संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्यतज्ज्ञांनी नागरिकांना भरपूर पाणी पिणे, तळलेले पदार्थ आणि जंक फूड टाळणे, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा आहारात समावेश करणे, स्वच्छतेची काळजी घेणे आणि नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे.
ताप किंवा इतर लक्षणे कायम राहिल्यास स्वतःहून औषधे न घेता वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.





