सणासुदीत खाद्यतेलावर मोठी कारवाई; किंमत तब्बल ५९ लाख!

Rokhthok Maharashtra 9 0

सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील आठ आस्थापनांवर छापे टाकून तब्बल ३४ हजार ४८१ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आलं आहे. या तेलाची अंदाजे किंमत ५८ लाख ९० हजार रुपये आहे.
बारामती, चाकण, जुन्नर, मुळशी, देहू, पुणे कॅम्प, गुलटेकडी आणि शुक्रवार पेठ परिसरात ही तपासणी करण्यात आली. यामध्ये सोयाबीन, पामोलिन, शेंगदाणा, राईस ब्रान आणि सूर्यफूल तेलाचा समावेश आहे.
तपासणीदरम्यान प्रयोगशाळा नसणे, प्रशिक्षित केमिस्टची अनुपस्थिती, तेलाच्या डब्यांचा पुनर्वापर आणि लेबलिंगसह गुणवत्ता तपासणीच्या नोंदींमध्ये त्रुटी आढळल्या. जप्त केलेल्या तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
मात्र, जप्त केलेलं सर्व तेल निकृष्ट किंवा असुरक्षित असल्याचं अद्याप सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच त्याच्या गुणवत्तेबाबत स्पष्टता येणार आहे.दरम्यान, खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असं आवाहन करण्यात येत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.