“मामा, लवकर ये… मम्मी-पप्पांना खूप लागलंय!” | परभणीत भीषण अपघात, दाम्पत्याचा मृत्यू

Rokhthok Maharashtra 11 0

“मामा, लवकर ये… मम्मी-पप्पांना खूप लागलंय!” रात्रीच्या अंधारात अपघातात जखमी झालेल्या अवघ्या ११ वर्षांच्या चिमुरडीचा हा फोन… पण दुर्दैव असं की, मदत पोहोचेपर्यंत आई-वडिलांचा जीव गेला होता! परभणीतील या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.
परभणीच्या उमरी फाट्याजवळ शनिवारी रात्री भीषण अपघात घडला. ब्रह्मपुरी येथील सासरवाडीहून परतणाऱ्या रोहित शेळके, वय ३८, आणि त्यांच्या पत्नी माधवी शेळके, वय ३५, यांची कार रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परला मागून धडकली.
या भीषण धडकेत दाम्पत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांची ११ वर्षांची मुलगी रितीक्षा गंभीर जखमी झाली.
मात्र, स्वतः जखमी असूनही रितीक्षाने प्रसंगावधान राखलं. वडिलांच्या मोबाईलवरून तिने मामाला फोन करून अपघाताची माहिती दिली. मामाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केलं.
या दाम्पत्याची दुसरी मुलगी घरी असल्याने या दुर्घटनेतून बचावली. मात्र, दोन मुलींच्या डोक्यावरचं आई-वडिलांचं छत्र हरपलं आहे.
एका अपघाताने हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं… आणि मागे उरला तो काळजाचा थरकाप उडवणारा प्रश्न—रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे आणखी किती कुटुंबं उद्ध्वस्त होणार?

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.