गरबा खेळून घरी आली, झोपेतच पत्नीची हत्या! छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये खळबळ

Rokhthok Maharashtra 10 0

छत्रपती संभाजीनगर हादरलं! गरबा खेळून घरी परतली, झोपेतच पत्नीची निर्घृण हत्या!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय आणि कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे.
रोहिणी मुकेश कुंभकर्ण, वय ४२ वर्षे, असं मृत महिलेचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रोहिणी यांनी महिलांसोबत देवीची स्थापना केली. रात्री उशिरापर्यंत गरबा खेळल्यानंतर त्या घरी परतल्या आणि झोपल्या. मात्र, सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पती मुकेश याने झोपेत असलेल्या रोहिणी यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
धक्कादायक म्हणजे, पत्नीच्या हत्येनंतर आरोपी मुकेश स्वतः दुचाकीवरून कन्नड पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पती-पत्नीमध्ये गेल्या सहा ते सात महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.
रात्री गरब्याचा आनंद अन् पहाटे काळाचा घाला! या घटनेने कन्नड शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.