नायब तहसीलदार ACB च्या जाळ्यात! २० हजारांची लाच घेताना कारवाई

Rokhthok Maharashtra 10 0

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. शेतरस्त्याच्या प्रकरणात अनुकूल आणि लवकर निकाल देण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरून निवासी नायब तहसीलदार सुनील सखाराम राठोड यांना २० हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकऱ्याने याप्रकरणी १८ ऑगस्ट २०२६ रोजी अमरावती ACB कडे तक्रार केली होती. पडताळणीदरम्यान ३० हजार रुपयांची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याचे ACB च्या अहवालात नमूद आहे. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात सापळा रचून कथित लाचेची रक्कम जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक रमेश ताले यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस निरीक्षक संजय शिंदे, पोलीस अंमलदार वैभव जायले आणि राजेश मेटकर यांच्या सहभागातून करण्यात आली. या कारवाईवर पोलीस उपअधीक्षक राजेश राठोड यांचे पर्यवेक्षण होते. तसेच पोलीस अधीक्षक बापू बांगर आणि अपर पोलीस अधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ACB ने दिली आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.