पुण्यात बिबट्याचा थरार! दुचाकींवर झडप, सोनाली थोपटे जखमी
पुण्यातील सिंहगडाच्या पश्चिम भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या सलग तीन घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खानापूर-रांजणे-पाबे रस्त्यावरील बापूजी बुवा मंदिर परिसरात मंगळवारी, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी अवघ्या तासाभरात बिबट्याने तीन दुचाकींवर हल्ले केल्याची घटना समोर आली आहे.
पहिल्या घटनेत आंबेगाव बुद्रुक येथील दोघे खामगावहून खानापूरच्या दिशेने जात असताना बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप घातली. यावेळी बिबट्याची दुचाकीच्या चाकाला धडक बसली आणि तो डोंगराच्या उताराकडे निघून गेला.
दुसऱ्या घटनेत थोपटेवाडी येथील एका व्यक्तीसोबत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या सोनाली थोपटे या युवतीला बिबट्याचा पंजा लागल्याने ती जखमी झाली. तिला प्रथम खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
तर तिसऱ्या घटनेत कोंडगाव येथील एका तरुणाच्या दुचाकीचा बिबट्याने सुमारे १५ ते २० फूट पाठलाग केला.
जंगल, डोंगरउतार आणि दाट झाडी असलेल्या या मार्गावर सलग तीन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.





