पुण्यात मद्यधुंद चालकाचा धिंगाणा! ४ वाहनांना धडक; संतप्त नागरिकांचा घेराव
पुण्यातील पौड रोडवर मद्यधुंद कारचालकाने धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास एमआयटी कॉलेजजवळ हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत भरधाव कार चालवत रस्त्यावरील तीन ते चार दुचाकींना धडक दिली. या घटनेत काही दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून, वाहनांचेही मोठे नुकसान झाले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली.
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कार अडवून चालकाला घेरले आणि त्याला जाब विचारला. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.
घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेतले असून, वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवले.मद्यपान करून वाहन चालवण्याच्या प्रकारामुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मद्यपान करून वाहन चालवू नका, अन्यथा स्वतःसोबत इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो.





