जामखेडमध्ये रक्तरंजित थरार! राहुल अंधारे यांच्यावर कोयत्याने हल्ला
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये चहाच्या टपरीवर युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जामखेड-नगर रस्त्यावरील पुढारी वड परिसरात बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
राहुल अंधारे, वय ३४, हे चहाच्या दुकानात मित्रासोबत बसले असताना तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक धारदार कोयत्याने वार केले. या हल्ल्यात राहुल यांच्या हाताचा मनगटापासूनचा भाग वेगळा झाल्याने ते गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाले. उपस्थित नागरिकांनी राहुल यांना तातडीने मदत करत उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.दरम्यान, हॉटेल चालक बंडू ढवळे यांनी या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.गजबजलेल्या रस्त्यावरील चहाच्या दुकानात घडलेल्या या घटनेमुळे जामखेड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





