MPSC पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट! तुकाराम मुंढे म्हणतात, ‘पत्र मिळालेलं नाही’
पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता पेपरफुटी चौकशी समितीवरून नवा प्रश्न निर्माण झाला आहे. तब्बल १२ दिवसांच्या आंदोलनानंतर सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती.
या समितीच्या सचिवपदी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, आता तुकाराम मुंढे यांनी आपल्याला यासंदर्भात कोणतेही अधिकृत पत्र किंवा नोटिफिकेशन मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
एमपीएससी प्रकरणाबाबत बोलताना, काही प्राथमिक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अधिकृत शासकीय संवाद किंवा आदेश मिळेपर्यंत यावर भाष्य करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्यासारख्या विश्वासार्ह अधिकाऱ्याचे नाव चौकशी समितीशी जोडले गेल्याने विद्यार्थ्यांना निष्पक्ष चौकशीची अपेक्षा होती.मात्र, नियुक्तीबाबत अधिकृत पत्रच मिळाले नसल्याच्या त्यांच्या वक्तव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. आता सरकारकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण कधी दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





