साताऱ्यात कॉलेज परिसरात अचानक नाकाबंदी; ६२ वाहनचालकांवर कारवाई!
सातारा शहरातील महाविद्यालय परिसरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम राबवली आहे. या कारवाईत तब्बल ६२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत ६० हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
१५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत सातारा शहर वाहतूक शाखेने ही विशेष मोहीम राबवली. वाय. सी. कॉलेज, छत्रपती शिवाजी कॉलेज आणि डी. जी. कॉलेज परिसरात अचानक नाकाबंदी करण्यात आली.
महाविद्यालय सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली.
दरम्यान, अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यासाठी देणाऱ्या पालकांनाही पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे.
सातारा शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी नागरिक आणि विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे.
तसेच, शहरातील विविध भागांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
त्यामुळे वाहन चालवताना हेल्मेट वापरा, वाहतुकीचे नियम पाळा आणि स्वतःसह इतरांचाही जीव सुरक्षित ठेवा!





