शिर्डी यात्रेत मोठी दुर्घटना! १७ साईभक्त जखमी
साईबाबांच्या यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना! मुक्कामाच्या ठिकाणी निवारा शेड कोसळले आणि १७ साईभक्त जखमी झाले
शिर्डीला पायी पालखी घेऊन निघालेल्या साईभक्तांवर मोठं संकट कोसळलं आहे. इगतपुरी येथे मुक्कामाच्या ठिकाणी अचानक निवारा शेड कोसळल्याने तब्बल १७ साईभक्त जखमी झाले आहेत. यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वाशिंद येथील साईभक्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पायी पालखी घेऊन शिर्डीच्या दिशेने रवाना झाले होते. प्रवासादरम्यान त्यांचा दुसरा मुक्काम इगतपुरी येथील साईभक्त निवासात होता.
रात्री जेवण आटोपून काही भक्त आराम करत असताना अचानक निवारा शेड कोसळले. त्यामुळे भक्तांमध्ये एकच धावपळ उडाली.
या दुर्घटनेत १७ जण जखमी झाले असून, दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर तिघांना फ्रॅक्चर झाले असून, उर्वरित दहा जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, सर्व जखमी भक्त हे वाशिंद परिसरातील रहिवासी आहेत.
दरवर्षी श्रद्धेने शिर्डीची पायी वारी करणाऱ्या साईभक्तांवर यंदा मोठे संकट ओढवले आहे. या दुर्घटनेमुळे यात्रेच्या मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.





