पुणे

मित्राकडून उसने घेतलेले १ कोटी ८८ लाख परत न देणाऱ्या व्यावसायिकास अटक – न्यायालयात जामीन अर्ज फेटाळला

पुणे :

संकटात वेळोवेळी ज्याच्याकडून ७ कोटी रुपये उसने पैसे घेतले , त्यातील थकलेले १ कोटी ८८ लाख परत न करता, त्या मदत करणाऱ्या मित्रालाच खोटी तक्रार करून अडचणीत आणणाऱ्या व्यावसायिकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर न्यायालयाने या व्यावसायिकाचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

अमित अरुण बजाज ( रा. क्लाऊड ९, कोंढवा)असे या अटक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्याच्या आणि बजाज कुटुंबातील एकूण ५ सदस्यांच्या विरोधात राजेश नंदलाल पेसवानी ( रा. कोरेगाव पार्क )यांनी तक्रार दिली आहे. अमित अरुण बजाज आणि राजेश नंदलाल पेसवानी हे १२ वर्षांपासून मित्र असल्यामुळे बजाज यांनी व्यावसायिक अडचणीचे कारण सांगून वेळोवेळी हात उसने पैसे मागून एकूण ७ कोटी रुपये पेसवानी यांच्याकडून आरटीजीएस द्वारे घेतले. ते परत देण्यासाठी वेळ लागत असल्याने दुकान, गोडावून पेसवानी यांना विकण्याबाबत करारनामा केला. मात्र, ते नावावर करून दिले नाही,ताबाही दिला नाही.

हात उसने घेतलेल्या ७ कोटी रकमेतील पाच कोटी परत केले. थकलेले १ कोटी ८८ लाख परत करण्याचे टाळले. त्यासाठी पाठपुरावा केला असता बजाज याने पेसवानी यांच्याच विरोधात खंडणी मागत असल्याचा खोटा गुन्हा दाखल करून अडचणीत आणले. मात्र, उसने दिलेल्यातील थकलेली १ कोटी ८८ लाख रूपये रक्कम नोव्हेंबर २०२२ पर्यंत न मिळाल्याने पेसवानी यांनी शिवाजीनगर पोलिसांमध्ये बजाज याच्या विरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार १३ डिसेंबर २०२२ रोजी दाखल केली.

पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२०, ३४ नुसार बजाजला अटक करून शिवाजीनगर न्यायालयात उभे केले असता त्याला सुरुवातीला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यानंतर 20 डिसेंबर रोजी त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने हे करीत आहेत .न्यायालयात पेसवानी यांच्या बाजूने अॅड. अनुप कुमार यांनी बाजू मांडली.