पुणे

वाढप्या अर्थात वेटर

आजकाल वृत्तपत्र उघडले की वाचायला मिळते ते अमुक मुलं व्यसनाधीन झाले आहेत तर काही मुलं गुंडगिरीच्या मागें लागून आपल्या आयुष्याची राखरांगोळी करत आहेत ! हे वाचल्यावर मन सुन्न झाल्याशिवाय रहात नाही. परंतु सगळीच तरुणपिढी तशी नसते हे खरं आहे. मध्यंतरी एका नामांकित हॉटेल मध्ये कुटुंबासह जेवायला गेलो होतो. तेथे एक हँडसम वेटर जेवायला वाढत होता. तो शांत पध्दतीने काय हवं, काय नको मोठ्या अदबीने विचारत होता. मला न राहून त्याला विचारले तु काही शिक्षण घेत आहे का? त्यावर तो “हो” एकच शब्द उच्चारुन पुढील ग्राहकांना सेवा देण्यासाठी वळला.

जेवत असताना मनात वेटर संदर्भात विचार करायला लागलो. ज्या वयात शालेय, महाविद्यालय शिक्षण घेत असताना मित्र-मैत्रिणी सोबत मौजमजा, धमाल करायची त्या वयातच शिक्षणाची आस पूर्ण करण्यासाठी आर्थिक कुचंबणा होऊ नये व भविष्यात कुटुंबाचा आधार होण्यासाठी दिवसभर हॉटेलमध्ये काम व रात्र शाळेचा अभ्यास करून स्वतःला घडवायचे या हेतूने प्रेरित होऊन ही मुलं कष्ट करतात हे पाहून त्यांच कौतुक करावे तेवढे थोडेच म्हणावे लागेल ! असे विचार चालू असताना तो परत आला म्हणाला आजून काय हवं साहेब ! अन् क्षणात विचारातून बाहेर आलो, म्हणालो नको काही नको ! स्मितहास्य करून तो बाजूला झाला.

विविध मोठमोठ्या शहरात आजही असे बरेच विद्यार्थी हॉटेलमध्ये काम करून स्वतःचे ध्येय साध्य करताना दिसून येतात.

हॉटेलमध्ये काम करत असताना काही वेळेला वेटरला ग्राहकाच्या बोललण्यामुळे मानहानीला सामोरे जावे लागते. आपण हॉटेलमध्ये खानपान साठी बराच वेळेस जातो. तसं पाहिलं तर पुणेरी मंडळी खवय्ये आहेत ही दूरवर ख्याती आहे म्हणूनच पुण्यासारख्या शिक्षणाचे माहेरघर असलेल्या मेट्रोपॉलिटीन सिटी मध्ये सर्वसाधारण हॉटेल पासून पंचतारीकेत हॉटेल मध्ये काम करताना आढळून येतात.

शिक्षण व नोकरीसाठी आता सर्वात जास्त तरुणांचा ओढा पुण्याकडेच आहे. सर्वांनाच मनासारखी नोकरी मिळेल असे होत नाही म्हणून तरुण वर्ग दुय्यम मार्ग स्वीकारतो तो म्हणजे आपल्या कुवती व शिक्षणाप्रमाणे हॉटेलमध्ये वेटरचे काम स्वीकारतो व स्वतःचे ध्येय पूर्तीसाठी प्रयत्न करतो. त्यातील काहीजण उच्च पदापर्यंत पोहोचल्याचे आपण पहातो. हे विद्यार्थी ध्येय पूर्ण करतात तर काहीजण फिल्मीदुनियेत स्वतः चे करिअर करतात. हे आपल्याला माहिती असते परंतु आपण नेमकं छोट्याशा गोष्टी म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो.

त्यातील दुर्लक्षितां कडूनच आपण बरेच तरुण सुप्रसिद्ध नट, नाट्य कलावंत घडलेला ऐकतो पाहतो तर काही तरुण आज आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योजक अधिकारी झालेले पाहतो. त्यावेळेस त्यांच्याबद्दल कौतुक वाटते व अभिमान वाटतो. पण त्यांच्या आयुष्यात मागे वळून पाहिल्यानंतर त्यांच्या खडतर वाटचालीची कल्पना येते.

असेच एकदा नव्याने सुरु झालेल्या हॉटेलमध्ये मित्रमंडळी बरोबर गेलो असताना वेटरला शेजारच्या टेबलवर बसलेल्या खव्वैयाने काही पदार्थ मागीतले होते त्यातील काही पदार्थ नाहीत असे सांगितले. त्यानंतर वेटरने त्याच्या मागणीनुसार टेबलवर जेवण आणून दिले. काही अवधीत त्या ग्राहकाचा रागाचा पारा चढला व मोठ्याने वेटरवर ओरडला ! आरे काय हे पदार्थ ? याला चवतरी आहे का ? जा घेऊन हे सर्व ! यावर मोठ्या अदबीने वेटर म्हणाला, साहेब दुसरी प्लेट देतो आणून ! परंतु यांचा पारा काही उतरायला तयार नव्हता. खरं तर पदार्थ बनवणार भटार खान्यातील आचारी आणि हॉटेलचा मालक/ मॅनेजर काऊंटरवर ! यात या वेटरची काय चुक ? परंतु अपमानास्पद बोलणं मात्र ऐकून घ्यावे लागले. येथे तो सुशिक्षित असून फक्त गरजेनुसार वेटर म्हणून काम करत असताना मानहानीला मात्र तोंड द्यावे लागले.

हल्ली पुण्यात अशा घटना वारंवार करताना आढळून येतात आचार्याच्या चुकांमुळे, अस्वच्छतेमुळे ग्राहकास हॉटेलमध्ये मनस्ताप सहन करावा लागतो परंतु पैसे देऊन खाणाऱ्या ग्राहकांना समोर दिसतो तो वेटर अन् त्याला रोष, रागाला सामोरे जाऊन अद्वात अथवा बोलणे ऐकावे लागते. किंबहुना काही चूक नसताना ग्राहकाच्या रोशाला सामोरे जावे लागते. बराच वेळा मानहानी सोसावी लागते. खरंच येथे बैठकी चूक आहे का याचा खोलवर विचार केल्यास तो दोषी नसतोच मुळी, परंतु दोष नसताना देखील झालेल्या अवमानाकडे दुर्लक्ष करून सेवा देत असतो.

वेटरलाही मान भावना असतात याचा विसर आपणास हॉटेलमध्ये गेल्यावर पडतो किंबहुना आपणास तो विसर पडतो असे म्हणालास हरकत नसावी

पुण्यातील एकदा अशाच प्रसिद्ध हॉटेलमध्ये आनंद सोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलो होतो. सत्कार समारंभ झाल्यानंतर एक तरुण पांढराशुभ्र वेशभूषा केलेला अर्थात स्मार्ट वेटर ट्रेमध्ये थंड पेय घेऊन आला आणि म्हणाला, गुड इव्हिनिंग सर कोल्ड्रिंक घ्या प्लीज ! क्षणभर त्याच्याकडे मी पाहतच राहिलो त्याला विचारले तुझे नाव काय ? तो म्हणाला मी रोहित रोहित ! तू बराच शिकलेला दिसतोस क्षणभर थांबून तो हसला व पुढे सरकत असताना त्याला थांबवले असता तो म्हणाला हो सर मी पदवीधर आहे व एमबीए करीत आहे. शिक्षणासाठी मोठा खर्च करण्याची कुटुंबाची परिस्थिती नाही म्हणून रात्री वेटरचे काम करून मिळालेल्या पैशातून शिक्षण घेत आहे. यातून मी नक्कीच यशस्वी होऊन चांगले नोकरी करेल आणि कुटुंबाला हातभार लावणार आहे ! हे वाक्य ऐकल्यानंतर मला त्याच्या कर्तुत्वाबद्दल अभिमान वाटला त्याला म्हणालो तुला मनापासून हार्दिक शुभेच्छा ! शुभेच्छा अदबीने स्वीकारून तो पुढे सरकला.

क्षणभर मन हेलावले, विचलीत झाले आणि त्याच्या बद्दल अभिमान वाटला.

मनात आलं भविष्यात ज्या ज्या वेळेस हॉटेलमध्ये जाण्याचा योग येईल
त्यावेळेस मात्र समोर येणाऱ्या वेटरला कधीच आरे तुरे न म्हणता त्याच्याशी प्रेमाने दोन गोड शब्द बोलूनच त्याच्या सेवेचा स्वीकार करेल. आपणही माझ्या विचाराचे नक्कीच सहमत असाल ना मग आपण सर्वजण त्याचा आदर करूया नोकरी व सेवा ही नक्कीच लहान नसून महान असते हे लक्षात ठेऊ या !

सुधीर मेथेकर,
हडपसर