पुणे

संत एकनाथांची नाथ षष्ठी – जेष्ठ पत्रकार सुधीर मेथेकर यांचा विशेष लेख

पंधराव्या शतकात जन्मलेले नाथ हे चमत्कारच होत. पाचशे वर्षांपूर्वी नाथांनी जे कार्य केले ते आज करण्याचे धारिष्ट आपल्याकडे नाही. त्यामुळे संत एकनाथ महाराज युगप्रवर्तकच होते.

संत एकनाथ महाराज शास्त्री, एक पंडित एक वेदाती, एक तत्त्वज्ञानी होते. त्यांची कथानके, आख्याने, अत्यंत रसयुक्त असून भाविकांच्या वा कामिकांच्या वा कामनी पूर्ण करणारी आहेत. नाथांनी वेदान्त आणि व्यवहाराची सांगड घालून दिली असून साधारण वाचकास यामुळे भवसिंधु पैलपार होता येते. नाथांनी आपल्या काव्यात सहज सोपा मार्ग साऱ्यांना मोठ्या सहजतेने अत्यंत प्रेमळ पणाने दाखवलेला आहे. ही माहिती कै.उध्दवराव मेथेकर यांनी “श्री संत एकनाथ” या संशोधनात्मक पुस्तकात नमूद केली आहे.

मृग अथवा चन्दन जसे एका ठिकाणी ठेवले तरी त्याचा सुगंध सर्व व्यापक असते तद्वत आपले कार्याचा सुगंध दरवळला पाहिजे तसेच नाथांचे साहित्य आहे किंबहुना ते सर्व समाजासाठी प्रबोधनात्मक आहे.

मृग अथवा चन्दन | वसविती ऐक स्थान |
परि ते आघवे वन | व्यापुनी असे सुगंधु ||

त्यांनी भारुड, अभंगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मुलन, जातीयतेच्या विरोधात कार्य केले एवढेच नव्हे तर कृतीतून दाखवूनही दिले. डोळस, कृतीशील समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले.

आजही अखिल महाराष्ट्राच्या कामकरी, शेतकरी, वैश्य आदींच्या जिव्हेवर काव्य वा अभंगाची पदे किंवा गौळणी खेळत आहेत. खरं निरक्षरांच्या कडूनच नाथांचे वाङमय मंदिर बनले आहे असे म्हटलं तर वावगे ठरू नये !

नाथांची काव्यसंपदा अपार आहे.
आजही भागवत, भारूडे, वाघ्या, जोगवा, जोशी जागल्या ही नाथांची मराठी रचना प्रसिद्ध आहेत. जोशी, आंधळा, पांगळा, बहिरा, मुका, वासुदेव, बाळसंतोष, पिंगळा, गारुडी, डोंबारी, कोल्हाटी, जोगी, जंगम, मानभाव, मांड, सोरी, महार, या सर्वावर नाथांनी स्फुटे लिहीली आहेत. तसेच भारुडाच्या माध्यमातून अनाचार, आंध्रश्रद्धा त्यांनी हलवून सोडल्या असून खडबडून जागृत करण्याचे कार्य एकनाथांनी केलेले आहे.

संतजनामध्ये नाथांचे स्थान आगळेवेगळे आहे. त्यांनी प्रत्यक्ष कृतीने समाजाला दाखवून दिले की प्रपंच व परमार्थ या गोष्टी काही परस्परविरोधी नाहीत. प्रपंचाकडे पाठ फिरवून परमार्थाची वाट धरणे ही गोष्ट चूक आहे.

श्री एकनाथ षष्ठी साजरी केली जाते. या दिवशी श्री एकनाथ महाराजांनी पैठण येथे जलसमाधी घेतली, असे मानले जाते. शके १५२१ ला फाल्गुन षष्ठीस नाथांनी समाधी घेतली. नाथांच्या आयुष्यात या षष्ठीला फार महत्त्व आहे. जनार्दन स्वामींचा जन्म, जनार्दन स्वामींना दत्ताचे दर्शन, नाथांना जनार्दन स्वामींचा अनुग्रह, जनार्दन स्वामींची समाधी आणि नाथांची समाधी या सगळ्या गोष्टी एका तिथीला झाल्या आहेत !

अशा प्रबोधन करणाऱ्या श्री संत एकनाथ महाराज यांना विनम्रपणे अभिवादन .

सुधीर मेथेकर