Uncategorized

कोरोनानंतर माध्यमे आणि सामान्य वाचक यांच्यातील ‘सोशल डिस्टन्सिंग’ कमी – विनोद शिरसाठ

कोरोनानंतरच्या काळात माध्यमे आणि सामान्य वाचक यांच्यातील ‘सोशल डिस्टन्सिंग’ कमी झाले. वर्तमानपत्र आणि तत्सम छपाई माध्यमांपेक्षा टेलीव्हिजन आणि डिजिटल माध्यमांना अधिक महत्व आले आणि हा बदल अगदी नकळत झाला. बदलते अर्थकारण यास कारणीभूत आहे, असे प्रतिपादन साधना साप्ताहिकाचे संपादक श्री. विनोद शिरसाठ यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने “कोरोनोत्तर पत्रकारिता: नवी आव्हाने” या विषयावरील संपन्न झालेल्या कार्यशाळेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

वर्तमानपत्रे ही मानवी श्रमांची अलौकिक निर्मिती असून, समाजजीवनच्या प्रत्येक टप्प्यांवर त्यांचा अनमोल असा उपयोग आहे. विद्यार्थ्यांनी इतर काही गरजा कमी करून वर्तमानपत्रे ही आपली दैनंदिन गरज झाली पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. वर्तमानपत्रे आणि साप्ताहिके डिजिटल स्वरूपात आल्यामुळे व त्यांच्या सहज उपलब्धतेमुळे वाचकांची वाचनश्रीमंती वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले. साधना साप्ताहिकाला देखील छपाईसोबत डिजिटल स्वरुपात यावे लागले. नवीन तंत्रज्ञान स्वीकारले नाही तर पारंपारिक माध्यमे कालबाह्य होतील असा इशारा त्यांनी दिला. राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. राहुल नरंगलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे अध्यक्षस्थानी होते.

महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी वाचनासोबत पत्रकरिता आणि माध्यमांमध्ये होणारा बदल लक्षात घेऊन आपल्या करिअरची दिशा निश्चित करावी. वाचन हाच जीवनातील यशाचा मूलमंत्र आहे,अशी भावना डॉ. घोरपडे यांनी व्यक्त केली. पत्रकार दिगंबर दराडे यांनी कोरोनानंतरच्या काळात विविध माध्यमांमध्ये विद्यार्थ्यांना असणाऱ्या संधींची महिती दिली. माध्यम क्षेत्रातील बदलत्या आव्हानांचा सामना करायची विद्यार्थ्यांची तयारी असेल तर पत्रकारिता हे करिअरसाठी अत्यंत उत्तम क्षेत्र आहे, असेही त्यांनी सांगितले.

उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. गणेश गांधिले, प्रा. नितीन लगड, प्रा. शीतल गायकवाड, प्रा. अनुराधा जाधव या कार्यशाळेस उपस्थित होते. अजय माळी, ईशा शिंदे, दिव्या कोकणे, पायल कांबळे आणि राखी ढाले या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.