पुणे

साहित्य सम्राट अण्णा भाऊंच्या फकिराला जोगणी मिळाली – कवी. विनोद अष्टुळ

पुणे (सतीश भिसे )

   साहित्य सम्राट पुणे व मातंग विकास संस्था खडकी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ तीन दिवसाचे धरणे आंदोलन आयोजित केले होते. यावेळी साहित्य सम्राटचे संस्थापक विनोद अष्टुळ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मातंग विकास संस्थेचे संस्थापक राजेश रासगे, समाजभूषण पुरस्कारथी शंकरभाऊ तडाखे, अखिल भारतीय बहुजन सेनेचे निलेश वाघमारे, गणेश भालेराव, लहुजी महासंघाचे प्रकाश वैराळ, लहुजी पॅन्थर संघटनेचे महेश सकट, सुनील मोरे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

   आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे उपकुलसचिव माननीय डॉ. मुंजाजी रासवे यांनी आंदोलनस्थळी शुद्धीपत्र मिळणे बाबत या विषयास अनुसरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम. ए. मराठी अभ्यासक्रमातील ग्रामीण साहित्य आणि शोध या ग्रंथातील अण्णा भाऊ साठे यांच्या “फकीरा” या कादंबरीतील लेखात “जोगणी” या शब्दाच्या ऐवजी “जोगतीण” असा शब्द आलेला आहे, या संदर्भात उपरोक्त लेखाचे लेखक व संपादक यांनी अनावधानाणे झालेली ही चूक मान्य केलेली असून, त्यात सुधारणा करण्यासंदर्भातील आपले लेखी म्हणणे मांडलेले आहे. या संदर्भात दिं १३ जुलै, २०२३ झालेल्या मराठी अभ्यासमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन अभ्यासक्रमातील संदर्भ ग्रंथातून “जोगतीण” ऐवजी “जोगणी” असा शब्द वाचावा अशी दुरुस्ती सुचविण्यात आली त्यास विद्यापरिषदेच्या दिं २७ जुलै,२०२३ रोजी झालेल्या सभेत मान्यता देण्यात आलेली आहे. या संदर्भात सर्व संबंधित महाविद्यालयांना त्याप्रमाणे सूचित करण्यात येत आहे. असे विद्यापीठाचे लेखीपत्र साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष, अभ्यासक व आंदोलक विनोद अष्टुळ आणि सहआंदोलक राजेश रासगे यांना सहभागी आंदोलकांच्या उपस्थितीत बहाल केले. 

 

   गेली अनेक वर्षे “जोगतीण” हा चुकीचा शब्द अभ्यासकांना अभ्यासाला असल्यामुळे जगविख्यात अण्णा भाऊंच्या “फकिरा” कादंबरीचा आदर्श आणि इतिहास नष्ट होणार होता. यासाठी गेली पाच वर्षे अभ्यासक श्री. अष्टुळ यांनी विविध उपायांद्वारे अथक परिश्रम घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे सातत्याने पाठपुरावा केला. आज धरणे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी पावसात उपरोक्त शुद्धीपत्र स्वीकारताना श्री. अष्टुळ यांनी या भावना व्यक्त केल्या. पुढे ते म्हणाले या यशात अनेकांचा सहयोग असून विशेष करून राजेश रासगे, राहुल नरंगळकर, गणेश भालेराव, निलेश वाघमारे, राजू ढावरे, धनराज खंडाळे, अर्चना अष्टुळ यांनी मोलाची साथ दिली.       

 

   यावेळी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य आदरणीय सुनील लोखंडे, शंकरभाऊ तडाखे, यांनीही या संशोधन् कार्याची प्रशंसा केली. तीन दिवसाच्या या धरणे आंदोलनामध्ये राजेश पाठेनम, तुषार काहुर, क्षुधांत पाटील, महादेव रंगा, विजय रास्ते, माधवराव घाटे. दत्ता जाधव, प्रेम माने, सुदर्शन चखाले, महेश सूर्यवंशी, सौरभ कस्तुरे, ओंकार अष्टुळ, सबिता चटर्जी इत्यादी असे अनेक सहभागी झाले होते. शेवटी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू,सर्व अधिसभा सदस्य, विधी परिषदेचे सदस्य, अभ्यास मंडळ आणि सहभागी बंधु भगिनींचे आभार मानून अभ्यासपूर्ण धरणे आंदोलन संपले असे आंदोलकांनी जाहीर केले.