लोणी काळभोर, (पुणे): जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून मंगळवारी (ता. १५) संपूर्ण दिवस सर्वधर्मीय एकत्र येत पूर्व हवेलीतील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती हि गावे बंद ठेवली होती. यावेळी बाजारपेठेतील तुरळक दुकाने सोडली तर शंभर टक्के बंद पाळण्यात आला होता. तसेच अत्यावश्यक सेवेतील मेडिकल दवाखाने वगळता सर्व व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला होता.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. ०५)सकाळी अकरा वाजता निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील भक्तीशक्ती शिल्प या ठिकाणी जगतगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून रतीची सुरुवात करण्यात आली. यावेळी कदम वाकवस्ती व लोणी काळभोर परिसरातील अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.
यावेळी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज कि “जय”,जय भवानी जय शिवाजी, ‘एक मराठा लाख मराठाच्या घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. दत्त मंदिर चौक परिसरात निषेध आंदोलन केले तसेच उपस्थित मान्यवरांनी आपापली मते व्यक्त केली.
दरम्यान, नागरिकांनी बंदला उत्स्फूर्तपणे पाठींबा दिल्याने नेहमी गजबजलेली लोणी काळभोर स्टेशन, लोणी काळभोर परिसरातील दत्त मंदिर चौक ओस पडल्याचे चित्र दिसून येत होते. यावेळी सर्व लहान मोठे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. गजबजलेले सर्व रस्ते निर्मानुष असल्याचे दिसून येत होते. लोणी काळभोर पोलिसांनी सदर ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस हवालदार रामदास मेमाणे, शिवाजी दरेकर आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.