पुणे

तू मोठा भाई झाला का, अशी विचारणा करीत धमकावणाऱ्यावर गुन्हा, हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद

हडपसर, दि. 11 ः मैत्रिणीला इन्स्ट्राग्रामवर मेसेज का केला असे विचारल्याच्या रागातून तू मोठा भाई झाला का, जीवे मारण्याची धमकी देत दुचाकीचे नुकसान करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर बसवराज जमादार (वय 20, रा. महादेवनगर, गोपाळपट्टी, मांजरी), अमन अशोक नरोटे (वय 19, रा. अष्टविनायक कॉलनी, बालाजी किराणा दुकानाजवळ, काळेपडळ, हडपसर), श्रीपती संतोष सरोदे (वय 19, रा. साडेसतरानळी, हडपसर) आणि श्रीपती सरोदे (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमोल राजाराम घाटे (वय 25, रा. विठ्ठल मंदिराशेजारी, माळवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मावस भावाबरोबर दुचाकीवरून घरी जात असताना माळवाडी-हडपसर येथे आरोपीने साथीदारांच्या मदतीने अडवून मैत्रिणीला इन्स्टाग्रामवर मेसेज केल्याबद्दल विचारल्यामुळे आरोपीला राग आला. आरोपीने फिर्यादीला तू मोठा भाई झाला का, अशी धमकी देऊन फिर्यादी व त्याच्या भावाला जीवे ठार मारण्याच्या इराद्याने धारदार लोखंडी हत्याराने मारहाण केली. अमरसह त्यांच्या साथीदाराने फिर्यादी व त्याच्या भावांना मारहाण केली व फिर्यादी यांच्या गाडीचे नुकसान केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी करीत आहेत.