पुणे

व्हॅक्सिनकिंग डॉ. सायरस पुनावालांकडून निराधारांना मायेची ऊब

आरोग्यदूत (व्हॅक्सिन किंग) डॉ. सायरस पुनावाला यांची ओळख सर्वदूर पोहोचली आहे. सिरम कंपनीतून 160 हून अधिक देशांमधील बालकांच्या निरोगी आयुष्यासाठी व्हॅक्सीन दिले जात आहे. आता रस्त्यावरील निराधारांना मायेची उब देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. शहर आणि परिसरामध्ये थंडीमध्ये कुडकुडणाऱ्यांना चादर, सतरंजी आणि पिलो कव्हर देण्याची जबाबदारी सिरम कंपनीचे सेवानिवृत्त एक्‍झिक्‍युटिव्ह ऑफिसर रवींद्र वामन जगताप यांच्यावर सोपविली आहे. जगताप यांनी शहर-उपनगरातील रस्त्यावर थंडीत कुडकुडणाऱ्यांना सोलापुरी चादर, सतरंजी, पिलो देत मायेची ऊब देण्याचे कार्य सुरू केले आहे.

दरम्यान, जगताप म्हणाले की, सहा महिन्यांपूर्वी सिरम कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर पद्मभूषण डॉ. सायरस पूनावाला यांनी थंडीमध्ये कुडकुडणाऱ्यांच्या अंगावर उबदार कपडे देण्याची जबाबदारी दिली. ती प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी रात्रीचे जेवण झाले की, रिक्षामध्ये गाठोडं घ्यायचं आणि शहर उपनगरातील रस्तो रस्ती कुडकुडणाऱ्यांना पांघरून घालायच, हा सेवाभाव सुरू केला आहे.

याचे मानसिक समाधान मिळत आहे. हीच तृप्ततेची शिदोरी घेत पुणे स्टेशन, शिवाजीनगर, महापालिका भवन परिसर, मंगळवार पेठ, ससून रुग्णालयासमोर, कात्रज-मंतरवाडी बायपास, सासवड रस्ता, हडपसर गाडीतळ, सोलापूर रस्त्यावरील पदपथावर अनेक मायलेकरं, बाप- लेकं थंडीमध्ये कुडकुडत आहेत. त्यांना मायेची ऊब दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य ओसंडून वाहताना समाधान मिळते. पद्मभूषण डॉ. पुनावाला यांच्या सहवासात नोकरी करताना अनेक गोष्टी शिकलो. त्यामुळे विश्वासार्हता कमावली. दुसऱ्याला दोषी ठरवण्यात वेळ न घालवता स्वतःला सिद्ध करून यशस्वी जीवनाची पायवाट निर्माण करण्यात खरी कसोटी असते, अशी जगताप यांची विचारधारा आहे.

धनजीशा पाजनीरगर यांच्यामुळे घडलो
संपूर्ण कुटुंब उघड्यावर आल्यानंतर कोवळ्या वयात पाटी-पेन्सील असण्यापेक्षा कपबशा विसळणे, हातगाडीवर भाजीपाला विकण्याची वेळ आली. भिकारी म्हणून जीवन जगताना धनजीशा पाजनीरगर यांच्या दूरदृष्टीमुळे माझ्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. तिसरीपर्यंत शिक्षण झाले म्हणून थांबलो नाही. प्रयत्नाची कास धरली. त्यातच पद्मभूषण सायरस पूनावाला यांचा सहवास लाभला. माझ्या जीवलग मित्रांनी पुस्तकरूपी भेट देऊन ज्ञानाची कवाडे खुली करून दिली. त्यातून जीवनाला कलाटणी मिळाली. सुबत्ता आल्यावर सर्वजण जवळ येऊ लागले. हीच आहे का माणुसकी, असा मनाला वारंवार प्रश्‍न पडतो, असे जगताप यांनी सांगितले.