पुणेमहाराष्ट्र

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत करा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची राज्य सरकारकडे मागणी

पुणे – काल झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रारंभिक आर्थिक मदत करावी. तसेच कृषी व महसूल विभागाला पंचनामे करून त्वरीत मदतीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

आधीच एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यातच कालच्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ऊस, द्राक्ष, बटाटा, कांद्यासह इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. त्यामुळे पंचनामे तातडीने करुन मदतीचे प्रस्ताव व्हायला हवेतच. मात्र पंचनाम्यांची प्रक्रिया होईपर्यंत न थांबता शेतकऱ्यांना प्रारंभिक नुकसान भरपाई देण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, शिरुर लोकसभा मतदारसंघातील आदिवासी भागातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या भातशेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने प्राथमिक पाहणी करून मदत करणे आवश्यक आहे. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षताही राज्य सरकारने घ्यायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.