पुणे

“हडपसर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड.. “अनेक दिग्गज नगरसेवक स्वगृही परतण्याच्या मार्गावर…

हडपसर / पुणे (अनिल मोरे )
हडपसर विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवकांनी काही दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची साथ सोडत शरद पवारांच्या पक्षात काम करण्यास सुरुवात केली आहे, हडपसर विधानसभा मतदारसंघात अजितदादांच्या पक्षांची पडझड सुरू झाली असून अनेक दिग्गज माजी नगरसेवक स्वगृही परतण्याच्या वाटेवर आहेत.
माजी उपमहापौर निलेश मगर यांच्यासह माजी उपमहापौर बंडू तात्या गायकवाड आणि योगेश ससाणे यांनी डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतल्याने हडपसर विधानसभा मतदारसंघात वर्चस्व असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे

.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस फोडली व मोठा गट घेऊन भाजप समवेत सत्तेत सहभागी झाले, त्यांच्याबरोबर अनेक आमदार देखील सत्तेच्या बरोबर गेले, सुरुवातीला शरद पवार यांच्याबरोबरच आहे असे सांगणारे आमदार चेतन तुपे देखील अजित पवार यांच्या समावेत गेले, शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या समवेतच राहण्याचा निर्णय घेतला, आमदार रोहित पवार यांचे जवळचे समर्थक माजी उपमहापौर निलेश मगर हे पण मूळ पक्षातच राहिले, पुणे शहर व हडपसर विधानसभा मतदारसंघात माजी महापौर प्रशांत जगताप यांनी आमिषाला बळी न पडता अजित दादा पवार यांच्याबरोबर न जाण्याचा निर्णय घेऊन एकाकी खिंड लढवली, सत्तेचा राजकारणात अजित पवार यांची होणारी हेळसांड बघून हडपसर विधानसभा मतदारसंघातील अनेक दिग्गज माजी नगरसेवक पुन्हा स्वगृही परतू लागले आहेत, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्यासह अजित दादांना हा मोठा धक्का मानला जात आहे. सुरुवातीला प्रशांत जगताप, निलेश मगर वगळता एकही माजी नगरसेवक शरद पवार यांच्या समवेत नव्हता परंतु लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आणि हळूहळू माजी नगरसेवक स्वगृही परतू लागले यामध्ये माजी उपमहापौर बंडू तात्या गायकवाड, माजी नगरसेवक योगेश ससाणे, मुंढव्याच्या राजकारणातील दिग्गज कोद्रे कुटुंबीय यांनी डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचारास सहभागी होत आम्ही शरद पवार साहेबांसमवेत असल्याचे दाखवून दिले.

हडपसर विधानसभा मतदारसंघात आमदार चेतन तुपे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करतात, सर्व निर्णय प्रक्रियेत ते सहभागी असतात त्यामुळे या पक्षात मोठं होण्याची संधी नसल्याने राजकारणात महत्त्वकांक्षा असलेले नेते यांनी शरद पवारांच्या समवेतच जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे, अजित पवार यांची हडपसर विधानसभा मतदारसंघात पक्षावरील पकड ढीली होत असून आगामी काळात अनेक जण स्वगृही परतल्यावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

“देश पातळीवर शरद पवार यांचे नेतृत्व सक्षमपणे काम करत आहे लोकांमध्ये पवार साहेबांवर प्रेम अद्यापही आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली हडपसर विधानसभा मतदारसंघात मोठ्या घडामोडी आगामी काळात घडणार आहेत, अनेक दिग्गज माजी नगरसेवक स्वगृही परतणार आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, विधानसभा निवडणुकीतही या मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडाच आम्ही रोवणार आहोत.
प्रशांत जगताप
शहराध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष पवार साहेबांच्या आम्ही पाठीशी ठामपणे उभा असून लवकरच मी स्वगृही म्हणजे साहेबांच्या पक्षात प्रवेश करणार आहे, लोकसभा निवडणुकीत डॉ.अमोल कोल्हे यांचे काम पूर्ण क्षमतेने करून त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणणार.
बंडूतात्या गायकवाड
माजी उपमहापौर