पुणे: (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज )
पुणे शहरातील सरकारी ससून सर्वोपचार रुग्णालय सध्या भलतेच चर्चेत आहे, पार्ट्या, रक्त अहवाल बदलणे, गुन्हेगारांना दाखल करून घेणे अशा एक ना अनेक गोष्टी ससून रुग्णालयात घडत आहेत ससून सर्वोपचार रुग्णालयातील गैरप्रकारास आळा बसावा व याची सखोल चौकशी व्हावी अन्यथा आंदोलन करणार असा इशारा शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिला आहे.
मागील काही दिवसांपासून पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील अनेक गैरप्रकार समाज माध्यमांद्वारे उघडकीस आले. रुग्णालयात गोरगरीब रुग्णांकडून पैसे उकळले जाण्याच्या घटना समोर आल्या, रुग्णांची शस्त्रक्रिया सरकारी योजनेमार्फत मोफत झालेले असताना सुद्धा रुग्णांकडून पैसे घेतले गेले, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून साहित्य आणायला सांगितले गेले, खाजगी औषधालयांमधून औषधे, शस्त्रक्रियेचे साहित्य खरेदी करण्याची जबरदस्ती रुग्णांच्या नातेवाईकांवर करण्यात आली तसेच न्यूरोसर्जरी विभागातील एका निवासी डॉक्टरने एका रुग्णाच्या नातेवाईकाकडून तब्बल २४ हजार पाचशे रुपयांची मागणी केल्याचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांद्वारे समोर आला व असे अनेक गैरप्रकार रुग्णालयात घडत असल्याचे दाखले देणारे पुरावे समोर आले. या घडलेल्या गैरप्रकारांवर प्रश्न विचारल्यास रुग्णालयाने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
याच घटनांचा पाठपुरावा करण्यासाठी शिवसेना पुणे शहराचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी रुग्णालयाला पत्र लिहून रुग्णालयात घडत असलेल्या गैरप्रकारांबद्दल विचारणा केली व गोरगरीब रुग्णांवर अन्याय करून त्यांना त्रास देणाऱ्या डॉक्टरांवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी वजा सूचना दिल्या व ते न केल्यास शिवसेनेकडून रुग्णालयाविरुद्ध आंदोलनाचा इशाराही दिला.
ससून रुग्णालयातील गैरप्रकार थांबले नाही व गोरगरिबांची पिळवणूक थांबली नाही तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन याबाबत चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी याकरिता पाठपुरावा करणार आहे.
प्रमोद नाना भानगिरे
शहरप्रमुख शिवसेना पुणे