पुणे, ता. १७- (प्रतिनिधी)
“केशव माधव विश्वस्त निधी” तर्फे रविवार,१६ मार्च रोजी ‘धुमसता मणिपूर’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
मणिपूर आणि ईशान्य भारतात ‘शिक्षणच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता’ या ध्येयाने पाच दशके मणिपूर येथे प्रत्यक्ष कार्य केलेले पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह जयवंत कोंडविलकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. पूर्वोत्तर सीमा भागातील परिस्थिती बद्दल जागरूक करताना कोंडविलकर म्हणाले,”
‘वसुदैव कुटुंबकम्’ या मूल्यांच्या आधारे भारताला जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचे असेल,तर नागरिकांच्या मनामध्ये प्रखर एकात्मतेची ज्योत सतत धगधगत रहायला हवी. पूर्वोत्तर सीमा भागातील वांशिक भेद, फुटीरतावाद,दहशतवादाचे सावट,मादक द्रव्यांचा व्यापार, रोजगाराच्या अल्प संधी,आणि त्यातून बिघडलेला सामाजिक समतोल ,राष्ट्रीयत्वाच्या जाणिवांचा अभाव,वांशिक वेगळेपणाची भावना आणि पाश्चात्यशक्तींचा सांस्कृतिक दबाव अशा विविध समस्यांमुळे भारताचा पूर्वोत्तर प्रदेश विशेषत: सीमा भाग नेहमीच धुमसता असल्याचे दिसून येते.
२१ व्या शतकातील बदलणारी भू- राजकीय समीकरणे आणि हिंद-पॅसिफिक भागाचे वाढते महत्व या बाबींचा विचार करता पूर्वोत्तर भारत सामरिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा ठरतो. यामुळेचे तेथील समस्यांच्या मुळाशी जाऊन काम करणे गरजेचे आहे. पूर्वोत्तर सीमा भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचा विचार खोलवर रुजविणे गरजेचे आहे.आरोग्य,शिक्षण सुविधा, कौशल्य विकास,स्थानिक संस्कृतीचे संवर्धन,युवकांच्या क्षमतांचा विकास यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. स्थानिकांमध्ये आपुलकी निर्माण करून आपलेपणाची भावना निर्माण करता येईल.त्यासाठी सामुदायिक स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहेत.
स्व.भय्याजी काणे यांच्या मार्गदर्शनात स्थापन केलेल्या पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून मूल्याधिष्ठित शिक्षणाचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचा विचार रुजविण्याचे कार्य गेले चाळीस वर्षांहून अधिक काळ करत आहे. प्रतिष्ठानच्या कार्यातून उभारलेल्या तीन शाळांतून वैश्विकतेचे भान असलेली आणि राष्ट्रीयत्वाची जाण असलेली पिढी घडत आहे. सेवा भावी संस्थांच्या कार्यातून शांतता प्रस्थापित करणे शक्य असल्याचा विश्वासही जयवंतजी कोंडविलकर यांनी व्यक्त केला.
पटवर्धन बाग,एरंडवणे स्थित “सेवा भवन”च्या स्व.मुकुंदराव पणशीकर सभागृहात रविवारी,१६ मार्च रोजी सकाळी दहा ते साडे बारा या वेळेत हे व्याख्यान संपन्न झाले.संगणक तज्ञ डॉ दीपक शिकारपूर हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.व्यासपीठावर पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे श्रीपाद दाबक,केशव माधव विश्वस्त निधीचे सचिव अरविंद देशपांडे,विश्वस्त योगेश कुलकर्णी,रवि जावळे ह्यांची मुख्य उपस्थिती होती.
यावेळी जयवंत कोंडविलकर ह्यांनी दृकश्राव्य (PPT- पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन) द्वारे मणिपूर व ईशान्य भारत येथे पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानने जे कार्य गेल्या पाच दशकात केले आहे त्याची माहिती उपस्थितांना दिली.
जयवंत कोंडिलकर यांचे स्वागत केशव माधव विश्वस्त निधीचे विश्वस्त रवि जावळे यांनी तर श्रीपाद दाबक यांचे स्वागत योगेश कुलकर्णी यांनी राष्ट्रीय विचाराचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन केले. प्रमुख पाहुणे डॉ दीपक शिकारपूर यांनी डिजिटल इंडिया विषयी माहिती दिली.तसेच पूर्वांचल भागातील विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंट,कृत्रिम बुद्धिमत्ता व संगणक साक्षरते विषयी मार्गदर्शन करण्यास तयार असल्याचे सांगितले.
प्रा.श्रुती मेहता यांनी पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान च्या कार्याची आणि भविष्यकालीन नियोजनाची माहिती यावेळी दिली.राष्ट्रीय एकात्मते बरोबर सामाजिक समरसता,पूर्वोत्तर सीमा भागाचा सर्वांगीण विकास आणि उत्तुंग कामगिरी करून राष्ट्रविकासात योगदान देणारी युवा घडविणे यासाठी प्रतिष्ठानला कार्य करायचे आहे.संस्थेच्या विस्तारित ध्येयपूर्तीसाठी शिक्षणा बरोबरच आरोग्य सुविधा, जैवविविधता आणि सांस्कृतिक संशोधन,क्रीडा संकुल असे विविध प्रकल्प नजीकच्या भविष्यात हाती घेण्याचे नियोजन केले आहे.आपल्या देशावर व संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या युवकांनी पूर्वोत्तर भारतातील राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.संस्थेच्या कार्यवाढीसाठी सहभाग आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रतिष्ठानच्या सक्षमीकरणासाठी भारत भवन, शुक्रवार पेठ, पुणे येथे कार्यालय कार्यरत आहे.
“केशव माधव विश्वस्त निधी”चे सचिव अरविंद देशपांडे यांनी केशव माधव संस्थेविषयी प्रास्ताविकात माहिती दिली.सूत्र संचलन दूरदर्शन कलाकार प्रशांत कुलकर्णी यांनी केले.आभार “केशव माधव” चे विश्वस्त योगेश कुलकर्णी यांनी मानले.उपस्थितांच्या प्रश्नांना जयवंत कोंडविलकर यांनी समर्पक उत्तरे दिली.
ह्या कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.