पुणे : दहशतवादाच्या विरोधातील भारताची कठोर भूमिका आणि संदेश जागतिक पातळीवर मांडण्यासाठी देशातर्फे पाठविल्या जाणाऱ्या एका शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. ही संधी प्रदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे सुळे यांनी आभार मानले आहेत.
सीमेपलिकडून पाकिस्तान सातत्याने दहशतवादी कारवाया करीत आहे . त्याचा भांडाफोड होऊन मुखवटा फाटणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्यासाठी शक्य ते सर्व काही करण्यास भारत तयार आहे. देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आपण सक्षम असल्याचे भारताने वेळोवेळी जगाला दाखवून दिले ही वस्तुस्थिती आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेची प्रतिनिधी म्हणून देशाचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला मिळाली हा मोठा बहुमान आहे. मतदार संघातील जनतेने आपल्यावर सातत्याने टाकलेला विश्वास, दिलेले अलोट प्रेम आणि सेवेची संधी यामुळेच हे शक्य झाले आहे. याबद्दल आपण सर्वांचे ॠणी आहोत, अशी भावना खासदार सुळे यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या देशाची एकता, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अखंड, अबाधित राखण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत, असे सांगत सुळे यांनी दहशतवादाविरोधात भारताची भूमिका जागतिक पटलावर मांडण्यास समस्त देशवासियांच्या वतीने आपण कटिबद्ध आहोत, असे पुढे नमूद केले आहे.