पुणे

पोलीस भरतीचं स्वप्न झालं अपूर्ण संग्राम शिंदे यांचा दुर्दैवी अंत…….

खाकी वर्दीचं स्वप्न, डोळ्यात देशसेवेची जिद्द आणि उराशी कुटुंबाला सावरण्याची आशा… पण दुर्दैवानं नियतीला काही वेगळंच मान्य होतं. छत्रपती संभाजीनगरमधून एक अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. पोलीस भरतीसाठी धावताना एका २३ वर्षीय तरुण योद्ध्याचा मैदानावरच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव संग्राम धोंडीराम शिंदे असं असून तो अवघ्या २३ वर्षांचा होता. मूळचा सांगलीचा असलेला संग्राम, छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील मैदानावर भरतीसाठी आला होता.

 

आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास १६०० मीटरची चाचणी सुरू असताना, धावता धावता संग्रामला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. संग्राम कोसळताच तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्याला तातडीने मदतीचा हात दिला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र दुर्दैवानं उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. एका तरुण स्वप्नाचा असा शेवट झाल्याने संपूर्ण मैदानावर आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये शोककळा पसरली आहे. सांगलीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा हा आधारस्तंभ आज कायमचा निमटला आहे. या घटनेमुळे पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक श्रमाचा आणि तरुणांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संग्रामच्या निधनाने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे