पुणे

“पुण्यात खळबळ! प्राचार्याला ब्लॅकमेल करून 7 लाखांची खंडणी 😱”

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्राचार्याला धमकावून आणि ब्लॅकमेल करून तब्बल सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप तिघांवर करण्यात आला आहे.

या प्रकरणात एका पोलीस उपनिरीक्षकासह दामिनी पथकातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा आणि आणखी एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

आरोपींनी प्राचार्याविरुद्ध POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची आणि अटक करण्याची भीती दाखवली, असा आरोप आहे. त्यानंतर दबाव टाकून पैसे घेतल्याचे म्हटले जात आहे.

या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.

आरोपींपैकी अजित बडे सध्या सायबर पोलिस ठाण्यात, सोनाली हिंगे शिवाजीनगर ठाण्यात दामिनी मार्शल म्हणून आणि सुदाम तायडे शिवाजीनगर ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.