पुणे

“देशाचे पंतप्रधान कोण?” दोन प्रश्नांनी उघड झाली बांगलादेशी महिलांची पोलखोल

पुण्यातील बुधवार पेठ परिसरात फरासखाना पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत 5 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलं आहे.
विशेष कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान या महिला बेकायदेशीरपणे भारतात राहत असल्याचं समोर आलं.

सुरुवातीला महिलांनी आपण पश्चिम बंगालच्या असल्याचा दावा केला. मात्र पोलिसांना त्यांच्या बोलण्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी राष्ट्रगीत म्हणायला सांगितलं आणि देशाचे पंतप्रधान कोण असा प्रश्न विचारला. याचं समाधानकारक उत्तर महिलांना देता आलं नाही.

 

तसंच पश्चिम बंगालमधील आसपासच्या गावांची नावं विचारल्यानंतरही त्या उत्तर देऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

या महिलांकडे भारतात राहण्यासाठी कोणतीही वैध कागदपत्रं नव्हती. पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या 11 महिन्यांत शहरातून तब्बल 95 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.