पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. हडपसर परिसरातील कामधेनु इस्टेटमधील एका प्रतिष्ठित सुपर स्पेशालिस्ट खासगी हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब आढळल्याने एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये संशयास्पद वस्तू दिसून आल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक म्हणजेच बीडीडीएस घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक तपासात या बॉम्बमध्ये तब्बल सात तासांचा टाइमर सेट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बीडीडीएस पथकाने सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हा जिवंत बॉम्ब सुरक्षितपणे ताब्यात घेत मोकळ्या जागेत हलवला.
या घटनेमुळे हॉस्पिटलमधील रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून परिसर काही काळासाठी सील करण्यात आला होता.
दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये असा बॉम्ब सापडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हा बॉम्ब नेमका कोणी ठेवला? त्यामागे घातपाताचा कट होता का? की वैयक्तिक वाद? याचा तपास आता पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
