पुणे

चेहऱ्यावर 80 टाके, 19 दिवस मृत्यूशी झुंज; 9 वर्षीय तारकेशचा दुर्दैवी अंत

भुसावळ शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ९ वर्षीय तारकेश विशाल झोपे या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
२४ एप्रिल रोजी सकाळी तारकेश शाळेत जात असताना नारायण नगर परिसरात एका कुत्र्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने थेट त्याच्या चेहऱ्यावर चावा घेतला. तारकेशच्या चेहऱ्यावर आणि नाकावर गंभीर जखमा झाल्या होत्या.

स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत त्याची सुटका केली आणि रुग्णालयात दाखल केलं. जखमा इतक्या गंभीर होत्या की त्याच्या चेहऱ्यावर तब्बल ८० टाके पडले होते.
जळगावमधील शिल्पा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना पुढील प्लास्टिक सर्जरीसाठी त्याला मुंबईला हलवण्यात आलं. मात्र १९ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर तारकेशची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.